स्वामी मकरंदनाथ

स्वामी मकरंद नाथ (श्री मकरंद माधव वझे ) १९७६ मध्ये आपल्या युवावस्थेत स्वामी माधवनाथाकडे आले . शालेय जीवनापासूनच त्यांना आत्मज्ञानाविषयी तळमळ होती. दिवाळीच्या दिवसात जेव्हा बाहेर दिव्यांच्या आराशी पाहत तेव्हा गावाबाहेरच्या टेकडीवर बसून ते आर्ततेने आळवीत - 'माझ्या जीवनात आत्मज्ञानाची पहाट केव्हा होईल ?'. १९७७ मध्ये स्वामी माधवनाथानी त्यांना अनुग्रहित केले.

शुद्ध परमार्थाच्या ओढीमुळे थोड्याच काळात ते स्वामीजींचे अंतरंग शिष्य बनले. त्यांची आध्यात्मिक विचार ग्रहण करण्याची कला व त्यांच्यातील नेतृत्व गुण स्वामीजींनी हेरले व त्यांना युवा केंद्र सुरु करण्याची प्रेरणा दिली . याच युवा केंद्राचे रुपांतर पुढे स्वामी माधवनाथ बोध प्रसारक मंडळात झाले .

मकरंद नाथानी गीता , ज्ञानेश्वरी , दासबोध , तुकाराम गाथा , उपनिषद इ . चा सखोल अभ्यास केला . त्याला स्वामीजींच्या प्रवचनांच्या श्रवणाची जोड दिली. नाम व ध्यान साधने मध्ये ते डूब देऊन राहत व त्यात अनेकदा त्यांना उच्च पारमार्थिक अनुभव आले.

सध्यस्थितीत स्वामी मकरंदनाथ नाथ संप्रदायाची धुरा समर्थपणे पेलत आहेत आणि अनेक साधकांना अनुग्रहित करून परमार्थाच्या वाटेवर मार्गदर्शन करीत आहेत.