स्वामी माधवनाथ

ईश्वर सर्वांमध्ये असतोच परंतु संतांची प्रकृती, त्यांचा देह, मन आणि बुद्धी अत्यंत शुद्ध असल्याने त्याचा अविष्कार संतामध्ये अधिक खुलून दिसतो. स्वामी माधवनाथ हे असेच एक अवतारी सत्पुरुष होते.

स्वामीजींचा (श्री माधव विष्णू उर्फ बाळासाहेब वाकडे) जन्म १ ऑक्टोबर १९१७ रोजी कोकबन, महाराष्ट्र येथे झाला . वयाच्या दहाव्या वर्षापासूनच त्यांनी भगवदगीतेचा अभ्यास सुरु केला व त्यानुसार आपले जीवन आखण्यास सुरुवात केली. वडिलांच्या आकस्मित निधनानंतर त्यांनी आपले गाव सोडून पुण्याला येण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी त्यांचे वय अवघे १७ वर्षे होते. आपल्या आई व भगिनी सोबत पुण्यासारख्या नवीन ठिकाणी त्यांनी आपल्या आयुष्याला सुरुवात केली . प्रथम टेलरिंग व नंतर कापडाचे दुकान सुरु केले. १९३९ मध्ये आपली बालमैत्रीण सरोजिनी (मातोश्री सरलाताई) यांच्याशी त्यांचा विवाह झाला . एक आदर्श संसारी आयुष्य जगत असतानाच बाळासाहेबानी ध्यान व नामाचा अभ्यास केला . त्याच बरोबर त्यांनी ज्ञानेश्वरी व दासबोधाचा अभ्यास सुरु केला .

१९५८ मध्ये बाळासाहेबानी स्वान्तः सुखाय ज्ञानेश्वरीच्या प्रवचनांना सुरुवात केली . १९६८ साली त्यांना पावसचे स्वामी स्वरूपानंद यांचा अनुग्रह लाभला . पुढे १९७३ साली स्वामी स्वरूपानंदानी नाथ संप्रदायाचे उत्तराधिकार प्रदान केले व स्वामी माधवनाथ ह्या नावाने हा संप्रदाय पुढे चालवण्यास सांगितले. स्वामी माधवनाथानी हजारो साधकांना अनुग्रहित केले व त्यांच्या पारमार्थिक उन्नतीसाठी ते अहोरात्र झिजले. त्यांनी हजारो प्रवचने, सत्संग यामार्फत पुणे व महाराष्ट्रातील अनेक साधकांना मार्गदर्शन केले व परमार्थ मार्गावर स्थिर केले .स्वामीजींचे विचारधन त्यांच्या ग्रंथ संपदा , ऑडीओ व विडीओ सी डी मध्ये उपलब्ध आहे.

बोले तैसा चाले या उक्ती प्रमाणे स्वामीजी आयुष्य जगले. परमार्थात भोंदुगिरीला त्यांनी थर दिला नाही. आपल्या तर्कशुद्ध निवेदनातून त्यांनी आयुष्यातील परमार्थाचे महत्व पटवून दिले. त्यामुळे अनेक तरुण साधक स्वामीजींचे शिष्य बनले. या तरुण साधकांवर त्यांचे विशेष लक्ष होते व त्यांना प्रेमाने घडविण्यासाठी त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

१९९१ मध्ये अर्धांग वायूचा झटका येऊन देखील स्वामीजींच्या उत्साहात फरक पडला नाही. अनुग्रह, प्रवचने व सत्संग याद्वारे प्रबोधन चालूच होते. ३० जुलै १९९६ ला गुरु पौर्णिमेच्या दिवशी स्वामी माधवनाथानी आपला देह सद्गुरु चरणी विलीन केला. स्वामीजींचे उत्तराधिकारी स्वामी मकरंद नाथ संप्रदायाचे कार्य पुढे चालवत आहेत.