काही प्रश्न
1. परमार्थ / अध्यात्माचा माझ्या जीवनाशी काय संबंध आहे?
2. आध्यात्मिक / पारमार्थिक आयुष्य म्हणजे काय ?
3. आत्मज्ञान म्हणजे काय ?
4. आत्म्याचे स्वरूप कसे आहे ?
5. मला आत्मज्ञान कसे प्राप्त होईल ?
6. साधनेचे कोणते विविध प्रकार आहेत ?
7. साधनेसाठी मला सद्गुरूंची आवश्यकता आहे का ?
8. माझ्या आत्मज्ञानाच्या प्रगतीमध्ये सद्गुरूंची भूमिका काय असेल ?
9. माझी नित्य , दैनंदिन कर्मे मला आत्मज्ञानासाठी सहाय्यभूत होतात का ?
10. ध्यान म्हणजे काय ?
11. अमन अवस्था कशी गाठता येईल ?
12. ध्यानाने आत्मज्ञानापर्यंत कसे पोहोचता येईल ?
13. भक्ती म्हणजे काय? भक्ती कशी करावी ?
14. भक्ती आत्मज्ञानाकडे कशी घेऊन जाईल ?
1. परमार्थ / अध्यात्माचा माझ्या जीवनाशी काय संबंध आहे?आपल्या जीवनात आनंद नेहमी काहीतरी इतर गोष्टींवर अवलंबून असतो. आपल्या इच्छा पूर्ण झाल्या असल्यास आपण आनंदी होतो, आणि त्या न झाल्या तर आपण निराश होतो. आपण सतत सुखाच्या शोधत असतो पण शाश्वत सुख हाती लागत नाही कारण ते बाह्य जगतातील गोष्टीवर अवलंबून असते. असे सुख हे तात्कालिक असते. ती मनाची एक स्थिती असते. अध्यात्म आपल्याला बिनशर्त आणि शाश्वत आनंद घेण्याची कला शिकवते म्हणून अध्यात्म आपल्या जीवनात संबंधित आहे. आपले आंतरिक सुख हि मनाची स्थिती नाही तर ती आत्म्याची स्थिती आहे. अध्यात्म हि ज्ञानाची अशी शाखा आहे जी आत्मज्ञानाविषयी आणि आत्मसुखाविषयी विचार करते. जी आपणाला आपले जीवन एका उंच पातळीवरून जगण्याची प्रेरणा देते.
2. आध्यात्मिक / पारमार्थिक आयुष्य म्हणजे काय ?आध्यात्मिक किंवा पारमार्थिक आयुष्य असे वेगळे आयुष्य नाही. त्यासाठी आपले लौकिक आयुष्य सोडण्याची आवश्यकता नाही. पारमार्थिक आयुष्य जगणे म्हणजे आपले नेहमीचेच आयुष्य एका विशिष्ठ बोधाने जगणे , एका उंच पातळीवर नेणें. आपल्या आयुष्यातील कर्मे करताना आपल्या आत्म्याला सतत स्मरून आत्मज्ञानासाठी करणे हे आध्यात्मिक आयुष्य. साहजिकच असे आयुष्य हे प्रेम , शांती , दया , क्षमा , करुणा आदि गुणांनी युक्त असते. त्यामुळे फक्त ती व्यक्तीच नव्हे तर तिच्या संपर्कातील सर्वांना सुखाचा अनुभव येतो.
3. आत्मज्ञान म्हणजे काय ?तुम्ही स्वःताला ' मी कोण?' असा प्रश्न केला आहे का ? तुम्ही स्वःताला देह, मन व बुद्धी यांच्यामार्फतच पाहता. यांच्या मार्फत सर्व कार्ये होत असल्याने हा 'बाहेरचा मी' आपल्या परिचयाचा असतो. आपण सहजपणे 'मी केले' , 'मी विचार करतो' , 'मी असे ठरवले' असे शब्दप्रयोग वापरतो, पण त्यातील 'मी कोण' हा प्रश्न कधीच विचारात नाही . प्रत्यक्षात देह, मन व बुद्धी हि फक्त कर्म करण्याची साधने आहेत. पण ती 'आत्म्याच्या' मुळेच कार्य करू शकतात. या आत्म्याला जाणणे व मी तो आत्माच आहे हे समजून घेणे याला आत्मज्ञान म्हणतात. थोडक्यात, मी देह-मन-बुद्धी नसून त्यापासून भिन्न असा आत्मा आहे व हा आत्मा परमात्मस्वरूप आहे याला आत्मज्ञान म्हणतात.
4. आत्म्याचे स्वरूप कसे आहे ?आत्मा हा सत् (अविनाशी), चित् (चैतन्यस्वरुप्) व आनन्द (शान्ति, समाधान) स्वरुप् आहे. तो जन्म-मरण-रहित , अचिन्त्य, अलक्ष व सर्व-व्यापी आहे.
5. मला आत्मज्ञान कसे प्राप्त होईल ?आत्मज्ञान, 'स्वः' ची जाणीव, हि आपल्यामध्ये उपस्थित असतेच. ती बाहेरून आणण्याची गरज नाही. जेंव्हा संदेह व चित्ताची मलीनता निघून जाते तेंव्हा ते आपोआप प्रगट होते. त्यामुळे चित्त-शुद्धी हि आत्मज्ञानासाठी आवश्यक आहे. या चित्त-शुद्धी व भ्रमनिरसनासाठी साधनेची आवश्यकता आहे.
6. साधनेचे कोणते विविध प्रकार आहेत ?साधनेचे अनेक प्रकार आहेत. त्यातील मुख्य म्हणजे - ध्यान, नाम-स्मरण व सतत आत्मानुसंधान. इतर प्रकारात भगवदगीतेसारख्या सदग्रंथांचे वाचन, श्रवण, तीर्थयात्रा करणे, प्रार्थना करणे यांचा समावेश होतो. याचबरोबर आपली नित्य कर्मे ही देखील साधनेचाच प्रकार होऊ शकतो, जर ती अलिप्ततेने करता आली तर.
7. साधनेसाठी मला सद्गुरूंची आवश्यकता आहे का ?आत्मज्ञानासाठी सद्गुरूंची आवश्यकता नक्कीच आहे. पोहोणे व गाडी-चालवणे यासाठी जर मार्गदर्शक लागतो, तर अध्यात्मशास्त्र हे अतिशय सूक्ष्म विषयाचे शास्त्र आहे. त्यामुळे आत्मज्ञानाचे अधिकारी असलेले सद्गुरूच असे मार्गदर्शन करू शकतात.
8. माझ्या आत्मज्ञानाच्या प्रगतीमध्ये सद्गुरूंची भूमिका काय असेल ?सद्गुरु शिष्याला अनुग्रहित करून त्याला अध्यात्म मार्गावर मार्गस्थ करतात. ते शिष्यातील चेतन जागृत करतात व त्याला साधना देतात.
साधकाने अथक प्रयत्न करणे आवश्यक असले तरी फक्त स्व-प्रयत्न पुरेसे नसतात, सद्गुरूंचा आशीर्वादच त्याला आत्मज्ञानाप्रत घेऊन जातात.
आपली कर्मे जर अहंकर्तृत्व सोडून करता आली तर ती आत्मज्ञानाला पूरक होतात. हि कर्मे जर अलिप्तपणे व फलाशा सोडून करणे आवश्यक आहे. सर्व कर्मे सावधपणे, प्रेमाने व ईश्वर अर्पण बुद्धीने करावीत.
हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की जी नियत कर्मे आहेत, ती वैयक्तिक असोत की सामाजिक की राष्ट्रीय , तेव्हढीच कर्मे करावीत. अखेरीस कर्म करतानाची मानसिकता व अध्यात्मिक भूमिका महत्वाची आहे
जेव्हा हि कर्मे अलिप्ततेने व समत्व-बुद्धीने होऊ लागतील, जेव्हा हे लक्षात येईल कि कर्मे देह-मन-बुद्धीकडून होत आहेत, पण आत्म्याच्या अधिष्ठानावर होत आहेत, ही स्थिती आत्मज्ञानापर्यंत नेण्यास योग्य समजावी.
मनाची अमन अवस्था अनुभवणे म्हणजे ध्यान. ध्यान हे एकाग्रता व चिंतन करणे यापेक्षा वेगळे आहे. या दोन्ही प्रकारात मन उपस्थित असते. पण या दोन्हींचा ध्यानासाठी उपयोग होतो.
11. अमन अवस्था कशी गाठता येईल ?ध्यानासाठी स्थिर आसनावर डोळे बंद करून बसावे. ध्यानाच्या प्रारंभी श्वासावर लक्ष ठेवावे. मनावर ताबा मिळवणे अवघड आहे पण मन व श्वास परस्परावर अवलंबून असल्याने, श्वासावर नियंत्रण करून मनावर ताबा मिळवणे शक्य होते.
असे ५-७ दीर्घ श्वास घेऊन झाल्यावर, त्या श्वासावरील लक्ष काढून मनात उठणाऱ्या विचारांकडे साक्षित्वाने, अलिप्तपणे पाहत राहावे. त्यासाठी भ्रूमध्यावर लक्ष केंद्रित करावे. यामुळे विचारांची गती कमी होईल
जशी विचारांची संख्या कमी होईल तशी दोन विचारांमधील अंतर जाणवू लागते. या स्थितीला अमन किंवा निर्विचार अवस्था म्हणतात. या स्थितीत साधकाला स्वरूपाचा बोध होतो, देह-मन-बुद्धी यांच्या पलीकडील स्वः ची जाणीव होते.
साधक ध्यानाचा नियमित अभ्यास करू लागला कि या अमन अवस्थेचा कालावधी लागतो . त्याचबरोबर स्वरूपाचा अनुभव घेऊ लागतो. देह-मन-बुद्धी पलीकडील आत्म्याचा साक्षात्कार त्याला नित्य होऊ लागतो. हा अनुभव जसा स्थिर होऊ लागतो तसा तो ध्यानापुरताच मर्यादित राहत नाही, तो सर्वकालीन होऊ लागतो. सर्व चराचरात त्या परमात्म्याचा अनुभव तो घेऊ लागतो.
13. भक्ती म्हणजे काय? भक्ती कशी करावी?भक्ती म्हणजे प्रेम. प्रेम हे माणसाला अत्यंत नैसर्गिक आहे. पण हेच प्रेम जेव्हा भगवंताकडे लक्षित होते तेव्हा त्याला भक्ती म्हणतात. भक्ती भगवंताच्या व संतांच्या पूजनाने, भजनाने, श्रवणाने करता येते. प्रेमाने घेतलेल्या नामाने भक्ती होते. बंद डोळ्यांनी, त्या भगवंतांचे स्मरण करत, श्वासावर लक्ष ठेवून घेतलेल्या नामाने भक्ती वाढते. अश्या भक्तीने मन एका ऐश्वरीय शांतीने भरून जाते. कोणतेही काम करत असतानाही ह्या नामाचा व शांतीचा अनुभव घेता येतो.
14. भक्ती आत्मज्ञानाकडे कशी घेऊन जाईल ?भक्तीचा अभ्यास करत असताना तो साधक सर्वत्र त्या प्रभूचा अनुभव घेऊ शकतो. आता हि भक्ती फक्त आराध्य दैवताबाबत सीमित न राहता, ती व्यापक होते. ती सर्व चर व अचर वस्तूंना व्यापते. सर्वत्र तोच एक आहे असा अनुभव येऊ लागतो. हा अनुभव हिच आत्मज्ञानाची स्थिती.